Sunday, August 10, 2014

गझल

थांबते जराशी ट्रेन पुन्हा धडधडते
 हे उदास खेडे वाट कुणाची बघते

तापला सभोती रानमाळ वैशाखी
 वार्‍यावर उगाच फूल तुझे लवलवते

कौलारू रंग मनावर चढतो इतका
 कोसळते बरेच, किंचित मागे उरते

हे प्रेम म्हणू की निव्वळ खेळ मनाचा
 ही नदी खळाळुन येते मग ओसरते

मी नवेपणाचे सोंग घेउनी निघतो
 पोचतो जिथे वहिवाट जुनी सापडते

अनंत ढवळे


ह्या गझलेत दोन गझल आहेत - कधीतरी वेगवेगळ्या लिहिण्याचा विचार आहे ..