Sunday, November 20, 2011

सहा नोव्हेंबर

सहा नोव्हेंबर

मरगळलेली एक रात्र.
आयुष्य गोठवून टाकणार्‍या थंडीत,
विजेच्या दिव्यातून निथळणारा स्तब्ध प्रकाश
स्टेशनबाहेरच्या मोकळ्या जागेत
कुडकुडत पडलेली दहाबारा दुर्दैवी कुटुंबे

काळ इथे संपत नाही
तसाच तो इथून सुरूही होत नाही
थिजलेला मात्र स्पष्ट दिसतोय
एका निद्रिस्त (दुर्दैवी) जोडप्याच्या ऐन मधोमध
एक लहानसं बाळ
लख्ख उघड्या डोळ्यांनी अंधार्‍या आकाशाकडे 
एकटक बघतंय
अधून-मधून किरकिरत जाणार्‍या
एखाद्या भरधाव वाहनाने किंचित दचकतंय
बाहेर, रस्त्याच्या पलीकडे
ऑम्लेटपावच्या गाडीवर पिऊन तर्र झालेत दोन नवकवी
धुंडाळताहेत मानवी जीवनाची शाश्वत अशाश्वत मूल्ये

" मी आलो तेंव्हा येथे काळोख दाटला होता
मी हसलो तेव्हा वरुनी, काळोखही हसला होता
मी तिमिरामधुनी आलो, जाईन तिमिराच्या गावा
जीवनसरितेच्या काठी, मॄत्युचा गंध उरावा..."


घड्याळाचा काटा तिनावर स्थिरावला
दुरून कुठलीतरी ट्रेन धडधडत आली
आणि प्ल्याटफॉर्मवर कपडयांच्या बोळ्यांत 
गोळाचोळा होऊन लोळणार्‍या कीटकांना 
दुर्लक्षित करून निघूनही गेली

" अशाच चुकतात येथ वाटा, असेच आयुष्य कोलमडते
उगाच आम्ही दिवए जाळतो, उगाच येथे पहाट होते.."


ही ट्रेन तशी इअथे थांबणारच नव्हती कधी
तसा तिच्या जाण्याचा फारसा खेदही कुणास वाटला नाही

ना स्टेशनास सर्वस्व मानून तिथेच हगण्या- खाणार्‍यांना,
ना इथेतिथे लोळत पडलेल्या बेघर कुत्र्या-मांजरांना,
ना स्टेशनाच्या उंच- उंच कलोनियल भिंतींना

एक क्षण थरथरून
सर्व काही पुन्हा स्थिरावलं
पुन्हा तीच संथ रात्र
विश्वास गिळून टाकणारं
तेच ते शाश्वत मौन

त्या दोघांनी एव्हाना नवा ग्लास भरला होता
ऑम्लेटच्या चविष्ट तुकड्यांसह
आणखी काही विचारांचा काथ्याकूट
आणखी काही पोकळ रचना

ते बाळ एव्हाना शांत झोपलंय
त्याच्या माथ्यावर अनिश्चिततेचं एक आभाळ झुलतंय, पण हे पाहण्यासाठी
एखाददुसर्‍या अश्वत्थाम्याखेरीज
फारसं कुणी जिवंत नाहीए
सर्व काही निश्चल, स्तब्ध, नीरव
पिक्चर पर्फेक्ट

या संपूर्ण चित्रात
मला फक्त मीच खटकतोय-

अनंत ढवळे

(पुर्व प्रसिध्दी - नव-अनुष्टुभ जानेवारी- फेब्रुवारी २००६
संपादकांचे आभार)

Saturday, November 5, 2011

माझे भरकटणे ठरून गेले होते

माझे भरकटणे ठरून गेले होते
जगण्याचे साचे तुटून गेले होते

एकेक पान जोडून पाहतो आहे
जे तुझ्यासवे विस्कटून गेले होते

ही रहदारी हे झगमग रस्ते इथले
मन हिरमुसले, गांगरून गेले होते

बघता बघता गर्दी ओसरली होती
देवत्व तुझेही सरून गेले होते

निर्वाह तुझ्या दु:खाचा करतो आहे
जे परंपरेने मिळून गेले होते....

अनंत ढवळे

गोष्ट

एक गोष्ट लिहीन म्हणतो
पहाटेच्या कोवळ्या उन्हात
आनंदाने डोलणार्‍या फुलांची

सूर्य माथ्यावर येऊन थांबेल तेव्हा
जगांची अदलाबदल सुरू झालेली असेल
जुन्या वाटा बुजून नवीन रस्ते बनू लागलेले असतील
काठांवर फुलारून येत असतील
मोहांच्या नवीन मालिका
सुरू झालेली प्रत्येकच गोष्ट
संपणारी असते कधीतरी
तशा संपू लागतील या मालिका देखील


कधी तरी, दिवसाच्या शेवटच्या प्रहरात
रात्रींच्या अंधारात;
सगळेच दुवे हरवून जातील, बुडून जातील
आठवणींच्या गल्लीबोळा
रस्ते, घरे आणि नदीकाठ
सभोवताली जमून येतील
सांगण्याजोग्या हजार गोष्टींचे ढीग
वर्षांबरोबर वाहत आलेली सुख-दःखे
आणि काहीबाही

मी ओलांडून मागे जाईन म्हणतो
या भिंती आणि कुंपणे
सरून गेलेले हंगाम
ऋतूंची हजार चक्रे
एका कोवळ्या पानाच्या शोधात

एक गोष्ट लिहीन म्हणतो,
पहाटेच्या कोवळ्या उन्हात आनंदाने डोलणार्‍या फुलांची
हजार हातांनी
जीवन वेचून घेणाऱ्या पहाटवार्‍याची....

अनंत ढवळे

Monday, September 19, 2011

रेताड....

रेताड

दिवस निथळून जातात
कपाळावरील घामासारखे
विझत जातात डोळ्यांचे दिवे

भाकरीवरची बुरशी वाढत जाते रात्रंदिवस
चढत जातं काळाचं किटण

रानोमाळ माजलेलं
घरांचं गाजर गवत
दारोदार उभी
नसलेलं बळ एकवटून त्वेषाने भांडणारी
कुपोषित माणसे

या खोलीचं भाडं किती
या गावाची किंमत काय,
तोंडावर माती ओढून ताणून दे भौ,
मला बघवत नाही हा जातवाल्याचा उच्छाद

किती अफाट आहे ओघळणारी लाळ
तुझी लाळ माझी लाळ/ लाळीच्या समुद्रावर
जाणतेपणाचं जहाज

पिवळी पांढरी पाने
या पानांतून खवखवणारी फ्रेंच सूज
बकाल वाढलेली शहरे
या शहरांच्या गल्लीबोळात
बोरी बाभळी अजूनही झुलताहेत बाहेर म्हणून
गळे काढणाऱ्या जुळाऱ्यांच्या टोळ्या
मी कुठून नादी लागतो
या पिसवाजळवांच्या

तू झोपेत बरळ
निद्रेत चाल
कर जिभेचे अपरिमित लाड
जुनेरातले पुस्तक फाड
तू दिवसरात्र लिहीत बस
हा मरणारे लिहून लिहून 
हिणवत राहतील कळप

भुंकत राहतात कुत्री
दूर रानातून कोल्हेकुई
मंदिरातून ढणाणा आरोळी
एका कोपऱ्यात पडून आहे रद्दी
( जशी तुझ्या हातावर मेंदी)
मला वाकुल्या दाखवतात
पन्नास गझला
सत्तर कविता

पिकेल पिकेल
काहीतरी नक्कीच पिकेल
डोळे लावून बसलीए
रेताड जमीन
भेगाळल्या छताकडे...

अनंत ढवळे

Saturday, September 3, 2011

किंचित..

किंचित..

मी इतिहासाचा एखादा सांधा बहुधा
माझ्यावरती गतकाळाचा ताबा बहुधा

तुझियासाठी किंचित रडलो आणि वाटले
या ही कर्तव्यातुन झाली सुटका बहुधा

उगाच क्षणभर सळसळली हिरमुसली झाडे
धुळारल्या पानांवर पडला तारा बहुधा

ही नात्यांची गजबज, हा पाला पाचोळा
मरण असावे निर्जनतेचा वारा बहुधा

दुनियेचा व्यापार पहावा, स्वस्थ बसावे
माझ्यासाठी एकच रस्ता उरला बहुधा

अनंत ढवळे

Thursday, July 7, 2011

ईश्वर म्हणजे

ईश्वर म्हणजे लाडावलेलं मूल असावं
ज्याचं खेळणं आपण हिसकावून घेतलंय

की रोजच दिसत जातात रस्तोरस्ती
लाकडी घरांवर धगधगणारे लोक
छातीच्या पिंजर्‍यांमधून
फडफडू जाणारे जीव
रखरखत्या उन्हात सुटून तुटू पाहणारी झाडे

माझे घन भरून जाऊ देत
किंवा येऊ देत येथे पूर
माझ्या सोबत वाहून जातील
तुझी तमाम मुळाक्षरेही

तुझ्या प्रार्थनांचा मी अर्थ सांगू शकेन
आणि मूठभर आग भरून घेऊ शकेन
लोपत जाणार्‍या वर्षांना ऊब देण्याइतपत
अंध समुदायांना जगवून ठेवण्याइतपत

पण मला वीट आलाय
वळणावळणावर उगवून आलेल्या जंगलांचा
आपल्या सभोवती साचून राहिलेल्या सर्वदूर कोंदटपणाचा

कसे अनुक्रमहीन होऊन पडलेत
वंशावळींचे इतिहास
की लोक पुसू सुटले आहेत
आपल्याच पाऊलखुणा

बाहेर नद्या दुथडून आलेल्या
सूर्य भरकटून सुटलेले
जमीन चहुवार खचलेली

हे अनुमान असावेत आपले
जे भरकटून भोवंडताहेत वार्‍यावर
किंवा आपल्या तत्त्वांचे अंतहीन जमाव

बहुता दिवसांचे दु:
वार्‍यावर हलणार्‍या प्रतिबिंबांमधून विरघळले
निथळले,
या खिन्न रात्रीच्या प्रहरात

होड्या निघाल्या आहेत
जमिनीच्या शोधात; जमीन दूर दूर होत जाणारी
की जसे विझून जावेत एकेक करून
जुन्या घरातले लोक

मोठं विलक्षण दृश्य आहे
मी वाहून जाताना पाहिलेत
माझे आदि आणि अंत
माझ्याच डोळ्यांपुढून

आज समुद्र मोठा भकास आहे
की जसे इथून पुढे सुरू होणार आहेत
अनिश्चिततांचे प्रदेश
आणि आपण जमिनीचा मोह देखील त्यागलेला

ईश्वर म्हणजे लाडावलेलं मूल असावं
ज्याचं खेळणं आपण हिसकावून घेतलंय

अनंत ढवळे

Sunday, June 5, 2011

होड्या

मघापासून पाऊस पडतोय
एका संथ लयीत निथळणार्‍या दुःखासारखा
तुला पाऊस आवडतो
मला पडतात प्रश्न
मी पावसाच्या सरींवर लिहिलेल्या
अदृश्य ऋचा वाचून
आणखीनच अस्वस्थ होतो
मला बालपणीचा पाऊस नेहमीच आठवतो
या पावसावर नोंदवलेली
आपली अनेक वर्षे
आपली साहसे
आपली भीती
आपले जयपराजय
आपली लहान सहान प्रासंगिक वेडं
आणि जन्माची अपरिहार्य नवलाई
पावसात नाचणारी मुले पाहून
मला आजही आनंद होतो
मुले नाचत आलीएत
वर्षानुवर्षं
पिढ्या न पिढ्या
ही जीवनाची न तुटणारी शृंखला
हे जन्माचे स्नेह तुषार
वाहत आलेत ओलांडून
असंख्य नद्या नाले
काळाचे अभेद्य पहाड

पाऊस
आजचा संथ पाऊस
आपल्या अस्वस्थतेचा पाऊस
किती पावसाळे
एकवटून राहिलेत, आपल्या मनात
रस्तो रस्ती साचून राहिलेलं
हे निर्वंश पाणी
असहायतेचं गढूळ पाणी
मुले या पाण्यात होड्या सोडतील
आपण न्याहाळत बसूत डबक्यांत साकोळलेलं आकाश
होड्या पार करून जातील
स्थळकाळाची क्षितिजं
मी ऐकत आलोय
गोष्टींतील होड्या
चंद्राला पोचतात
मुले बघतील आपापल्या लहानशा होड्यांचे
वीत दीड वीत प्रवास
आणि टाळ्या पिटतील
मुले टाळ्या पिटतील
होड्या चंद्राला पोचेतो
आपण न्याहाळत राहू
गढुळल्या पाण्यात विस्तारत जाणारी क्षितिजे
चाळत राहू
आपल्या वैयक्तिक इतिहासांची
भिजलेली पिवळसर पाने......

अनंत ढवळे
( २००८ )
( पुर्व प्रसिध्दि - मनोगत दिवाळी ०८ / संपादकांचे आभार )

Thursday, May 5, 2011

बाहेर बदलत जातात ऋतू

१.

पहाट होईतो जागीच असतात
मनातली हिंस्र भुते
मी कधीच हसत नाही खराखुरा म्हणून
डोळे मिटून निपचीत पडलेल्या असतात
चारी भिंती
छतातून गळत असते
मागेच कधीतरी वितळलेली हाक

मोठा विलक्षण असतो
शोकमग्न रात्रींचा विलास

२.

पाण्याजवळ थांबतो, तर
सरसरणारा वारा सांगत बसतो
भरकटणार्‍या पाचोळ्याची व्यथा
आगीजवळ बसतो तर थंडावतात ज्वाळा आणि
सांगत बसतो धूर, विझण्याच्या ट्रॅजिक कथा

मी निसर्गात विलीन झालोय
मातीत मिसळण्याआधीच

३.

तू म्हणतेस प्रकाश, मी म्हणतो हा अंधार
गुंडाळत जाईल संवत्सरे, तू म्हणतेस
पावसाने धुऊन निघतील रस्ते, मी म्हणतो
यंदा वाहून जातील या वस्त्या, तू म्हणतेस हस
मी मोजत बसतो अश्रू अश्रू

सुरूच असतो दोहोतील पुरातन संवाद
बाहेर बदलत जातात ऋतू

अनंत ढवळे

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...