Wednesday, December 29, 2010

जुलूस...

खिन्न होऊन उभी आहेत गेली काही वर्षे
आभाळाला अशात फुटलीच नाही पालवी
कुठेतरी दूरवर जाऊन पोचलाय किरणांचा जुलूस

ठिबकून गेलं सगळ्या शरीरातील रक्त
तरी काहीच समजलं नाही
इतके धुळकट रस्ते

शब्द न शब्द पाठ आहे
त्या विहिरीवर कोरलेला
जिथे मीच केलं होतं माझं विसर्जन
तुझ्या डोळ्यातल्या अर्ध्यामुर्ध्या पहाटस्वप्नांसकट

चिऱ्यावर चिरा रचला
दिवसावर दिवस
स्वतःच बांधली
स्वतःची कबर

आता
स्वतःची एलेजी लिहिता लिहिता
आठवत बसलोय
किती दिवस झालेत
अखेरचं हसून...

अनंत ढवळे
2006/7

Saturday, December 18, 2010

पाहे तिकडे दिशा ओस...

पाहे तिकडे दिशा ओस । अवघी आस पायांपे
मनीचे साच होईल कईं । प्रेम देई भेटोनी
( तुकाराम )

मी जिकडे पाहतो तिकडे दिशा ओस पडून आहेत.. माझी आस तुझ्या पायांशी लागली आहे.. माझ्या मनातली भावना कधी खरी होईल ? एकदा मला भेट, तुझे प्रेम मिळू दे...

Monday, December 13, 2010

या झाडावर हा कुठला रोग पडलाय

या झाडावर हा कुठला रोग पडलाय
की हिरमुसून गेलंय सगळं जंगल

मला असं वाटतं की ही जुनी झाडं
जगली पाहिजेत खूप दीर्घ काळ
डोळ्यांमधले चंद्र दुधाळेपर्यंत
म्हणजे मला कल्पिता येतील
या झाडांसमेत
इतिहासातली पात्रे

आज संध्याकाळपासून
खूप जोराचा वारा वाहतो आहे
आणि मला या भिरभिरणाऱ्या पाचोळ्याकडे पाहून
ढीगभर रडावंसं वाटत आहे.

अनंत ढवळे