गेल्या काही दिवसांपासून कवितेच्या एका फॉर्मवर विचार करतो आहे. न संपणारा, केंद्रवर्ती विचार आणि त्या भोवती फिरणारी आकलने (विखंडित कडवी) - म्हणून आवर्त्त हे नाव दिले आहे तात्पुरते. विचाराची अंगभूत लय सर्वतः व्यक्त होण्यासाठी गझलेचा साचा कधी-कधी रिजीड होतो. तर अभंग आणि अष्टाक्षरीची वळणे बरेचदा विचार भलतीकडेच नेतात. म्हणून हा खटाटोप. बाकी लयीचा हट्ट का हा प्रश्न निरर्थक आहे. लय हे पौर्वात्य जाणीवेचे आणि कवितेचे मूलभूत रूप आहे.
आवर्त – १
जातेय मिळत ह्या एकांताला सगळे
आवाज भटकले, कितीतरी कोसांवर
जावून थडकले
परतून पुन्हा आलेले, इतके काही
निष्कारण ओढे
रात्रीस थबकल्या निर्जन झाडांवरती
थेंबांचे पडणे
जातेय मिळत ह्या एकांताला सगळे
लाटांचे बनणे फुटणे पाहत बसलो
भासांची दुनिया
सापडली होती वर्षांमधली दारे
थोडीशी उघडी
काळाची ओबड धोबड चित्रे आली
काढाया रेघा
जातेय मिळत ह्या एकांताला सगळे
निर्धोक भटकली इच्छा येथे-तेथे
येवून थबकली
हे किल्मिष तोडू बघते बांध तरीही
धादांत घसरणे
रस्त्यात थांबणे झाले जर का थोडे
समजेल कदाचित
जातेय मिळत ह्या एकांताला सगळे
- अनंत ढवळे