Wednesday, September 28, 2016

समकालीन गझल

'समकालीन गझल' ह्या अनियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला आहे. 'समकालीन गझल' ह्या फेसबुक समूहात तो बघता येईल. वाचा, चर्चा करा, टीका करा. स्प्रेड द वर्ड !

Saturday, September 3, 2016

गझल

रात्र, तुझ्या डोळ्यांची जादू
गोष्ट चालली आहे लांबत


किती दूर आलेलो आपण
रमत- गमत वाटा धुंडाळत


रंग रूप उतरून चालले
ओळख जाते आहे हरवत



कसे तुझ्याशी संवादावे
तिथवर काही नाही पोचत



काय काय पडलेले मागे
उगाच बसलो आहे मोजत...


--
अनंत ढवळे


(ह्या गझलेत मतला नाही)

एक शेर

परिचीत कुणी भेटेल शक्यताही नाही
हे गाव नव्या शतकात नागरी झालेले
अनंत ढवळे

चार शेर


मी म्हणतो मी ह्या काळाची सूक्ते लिहितो
खरे पाहता काळच माझी कवने लिहितो

पदोपदी हे का वाटत जाते जगताना
कुणीतरी भलताच आपले जगणे लिहितो

सुसंगती जगण्यातच जर उरलेली नाही
काय वावगे करतो जर बेढंगे लिहितो

रक्तामधला जोर देत असतो या धडका
जे झालेले नाही ते झालेले लिहितो

अनंत ढवळे

Friday, September 2, 2016

दहशत

रस्त्यारस्त्यांतून
कानाकोपर्‍यांतून
चकचकीत ऑफिसांतून
शाळाकॉलेजांमधून
भरगच्च गर्दीच्या
बसट्रेनलिफ्टमधून
घराच्या चार भिंतीतून
ओळखीच्यांतून
नातलगांतून
शिक्षकबॉसभाऊदिरांतून
बलात्काराची दहशत घोंघावत येते आहे
कुठूनकुठून
कुणाकुणातून ..
--
अनंत ढवळे

1

कडेकपारीत राहणारे लोक
काय विचार करत असतील
गंमत म्हणून डोंगर चढणारी
डिझायनर माणसं पाहून?

--

अनंत ढवळे

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...