Saturday, July 30, 2016

एक कथा

सध्या एक कथा लिहितो आहे, आलेख या ब्लॉगवर ती वाचता येईल :


http://aaalekh.blogspot.in/



Tuesday, July 26, 2016

अनुकरणे

या गझलेवरून प्रेरित एक गझल अशात वाचण्यात आली. अर्थात हे नवीन नाही . गेल्या दहाबारा वर्षांत विविध जालीय माध्यमातून आलेल्या , किंवा त्याही  आधी माझ्या मूक अरण्यातली पानगळ या गझलसंग्रहातल्या अनेक गझलांची अनेक अनुकरणे पहायला मिळाली, मिळताहेत . मी अर्थातच कुणाला या बद्दल हटकत नाही. नव्या पिढ्यांवर आधीच्यांचा प्रभाव असणारच...पण बरेचदा समकालीनांनी देखील अशी अनुकरणे केली आहेत. असो.

नकोसे तुला आज जे वाटते
उद्या तेच सारे मिरवशील तू

बदलतात येथे जशा तारखा
बदलतात सारे बदलशील तू

अशी वेळ येईल की एकदा
तुझे तत्व पायी तुडवशील तू

अनंत ढवळे
(मूक अरण्यातली पानगळ या संग्रहातून
प्रसीद्धी वर्ष २००६ )

Monday, July 25, 2016

धन्यवाद !

या ब्लॉगची वाचक संख्या बघता बघता चौदा हजारांवर जाऊन पोचली आहे. कवितेच्या तथाकथित मुख्यधारेपासून दूर राहणार्‍या माझ्यासारख्या एखाद्या अप्रसिद्ध कवीच्या कविताविषयक ब्लॉगसाठी ही संख्या मोठीच आहे. इथे येणार्‍या  सर्व वाचक मित्र मैत्रिणींचे पुन्हा एकदा आभार !

अनंत ढवळे

Tuesday, July 19, 2016

होड्या

मघापासून पाऊस पडतोय...
एका संथ लयीत निथळणार्‍या दुःखासारखा
तुला पाऊस आवडतो
मला पडतात प्रश्न
मी पावसाच्या सरींवर लिहिलेल्या
अदृश्य ऋचा वाचून
आणखीनच अस्वस्थ होतो
मला बालपणीचा पाऊस नेहमीच आठवतो
या पावसावर नोंदवलेली
आपली अनेक वर्षे
आपली साहसे
आपली भीती
आपले जयपराजय
आपली लहान सहान प्रासंगिक वेडं
आणि जन्माची अपरिहार्य नवलाई


पावसात नाचणारी मुले पाहून
मला आजही आनंद होतो
मुले नाचत आलीएत
वर्षानुवर्षं
पिढ्यानपिढ्या
ही जीवनाची न तुटणारी शृंखला
हे जन्माचे स्नेह तुषार
वाहत आलेत ओलांडून
असंख्य नद्या नाले
काळाचे अभेद्य पहाड


 पाऊस
आजचा संथ पाऊस
आपल्या अस्वस्थतेचा पाऊस
किती पावसाळे
एकवटून राहिलेत, आपल्या मनात
रस्तो रस्ती साचून राहिलेलं
हे निर्वंश पाणी
असहायतेचं गढूळ पाणी
मुले या पाण्यात होड्या सोडतील
आपण न्याहाळत बसूत डबक्यांत साकोळलेलं आकाश
होड्या पार करून जातील
स्थळकाळाची क्षितिजं
मी ऐकत आलोय
गोष्टींतील होड्या
चंद्राला पोचतात
मुले बघतील आपापल्या लहानशा होड्यांचे
वीत दीड वीत प्रवास
आणि टाळ्या पिटतील
मुले टाळ्या पिटतील
होड्या चंद्राला पोचेतो
आपण न्याहाळत राहूत
गढुळल्या पाण्यात विस्तारत जाणारी क्षितिजे
चाळत राहूत
आपल्या वैयक्तिक इतिहासांची
भिजलेली पिवळसर पाने......


--
अनंत ढवळे
(2008/ वडगाव , पुणे )

काही शेर


 काही शेर :

रात्र, तुझ्या डोळ्यांची जादू
गोष्ट चालली खूपच लांबत 

किती दूर आलेलो आपण
रमत गंमत वाटा धुंडाळत

दारावरती पाटी नाही
ओळख जाते आहे विसरत

अनंत ढवळे

Friday, July 15, 2016

साहित्यात

साहित्यात प्राथमिक दुय्यम असे काही नसते. तत्कालिन समज आणि साहित्यिक समुदायांची दिशा अमुक साहित्य महत्वाचे आणि अमुक कमी महत्वाचे ठरवत असली तरी ही समज काळासोबत बदलत जाते , आणि महत्वाच्या साहित्याबद्दलच्या कल्पना देखील.

शेरे शोर अंगेज

मीरने शेरे शोर अंगेज ही कल्पना मांडली आहे. मी तिचा अर्थ कवितेतला अंतर्गत संघर्ष आणि उद्रेक या अंगाने घेतो. एक प्रकारचा गोंधळ , केऑस. शब्द, विचार आणि जाणिवांचा गोंधळ:

जहां से देखिए एक शेर ए शोर अंगेज निकले है ।
कयामत का सा हंगामा है हर जा मेरे दीवां में..
...
(मीर तकी मीर)

1

काळासोबत आपण बदलत जातो . या संदर्भातला माझा एक जुना शेर :


बदलतात येथे जशा तारखा
बदलतात सारे, बदलशील तू ...

घोडे


अचानक भानावर आल्यागत
धावत सुटलेत
इच्छांचे असंख्य घोडे

 
मागे पुढे
काचेरी इमारतींचे उत्तुंग वैभव
या वैभवात
सर्वत: प्रवेश निषिद्ध असणारे
तू, मी

 
 
अपरिमित   इच्छाधार्‍यांची  खडी  फौज;
घोडे पाण्याला थांबणार नाहीत
घोडे सावलीला  थांबणार नाहीत
घोडे पाळणारेत नाकातोंडातून रक्त येईतो

 
 
बाहेर नुकतीच पहाट झालीये
एक लहानसा पक्षी
डहाळीवर बसून गाणे गातो आहे ..

 
 
 
अनंत ढवळे

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...