Friday, October 25, 2024

गझल

आठवणींच्या जंगलातले मोर जसे 

बोरबनातिल कच्चे-पक्के बोर जसे 


ह्या झाडाच्या सावलीमधे ऊब अशी 

माझ्यासोबत बसलेले की थोर जसे


घट्टमिट्ट प्रेमाच्या ह्या लडिवाळ कथा

काकणातले चमचम चांदणकोर जसे


ही पहाट इतकी निर्मळ, अव्याज अशी 

अंगणात दुडदुडणारे की पोर जसे


काळ किती लोटला येथवर पोचेतो

डोइवर होते ओझे घनघोर जसे 


.

अनंत ढवळे

*बोर - एकवचनी

Monday, October 14, 2024

1

लोक 

वादळानंतरची भकास शांतता

बघत बसलेले


पानगळीच्या पानांमधले 

पिवळसर तांबूस बुध्द 

निर्विकार बघत बसलेले


जगण्याचा जुनसर अर्थ

आसपासचे विश्व

फुटत विस्फोटत जाताना बघण्याखेरीज

इतर काहीच नसणे 

हे उमजून घेत बसलेले


समज आणि दंतकथेच्या पातळसर सीमेवर

गोंधळून उभे 

असल्यासारखे


_


अनंत ढवळे 

Thursday, October 10, 2024

माझ्या इंग्रजी कविता


 

ह्या आठवड्यात माझ्या इंग्रजी कवितावाचनाचा एक कार्यक्रम "रिव्हर रीड" उपक्रमांतर्गत रेडबॅंक, न्यू जर्सी येथे होतो आहे. मराठी वाचक मित्रांच्या माहितीस्तव इथे ही नोंद.  फिचर्ड रीडर म्हणजे कुठल्याही कविता वाचनातले निमंत्रित कवी. फिचर्ड रीडर कवितावाचनाच्या सुरुवातीला साधारण वीस पंचवीस मिनिटे आपल्या कविता ऐकवतात, आणि त्यानंतर ओपन माईक पार पडतो. 

Friday, October 4, 2024

1

मित्तर चित्तर भुरे कबूतर 

ह्या छपराहुन त्या छपरावर 


वर दाटीवाटी मेघांची

खाली नुसती तगमग दुष्कर


वाटाड्या जर निघला भोंदू

हे खापर फोडा वाटेवर


काय तुझा हा उलटा धंदा

शिकून सवरुन बनला कट्टर


कुठे तुझ्या डोळ्यांत उतरलो

रेघोट्या घोटल्यात वरवर


ये रे ये आषाढी मेघा

घेउन जा हे माझे पत्तर


.


अनंत ढवळे

Saturday, September 28, 2024

गझल

मघाचपासुन वाऱ्याची नुसती भणभण

त्यात मला गावेना माझे उच्चारण


अवसादाचे रंग भरुन गेली दशके

खिन्न पिढीचे हसणे सुध्दा निष्कारण


इतिहासाचे थोटुक धुमसत पडलेले

हवा फुंकणाऱ्यांना कर की पाचारण


किती दिवस ही लपाछपी हे सोंग तरी 

खोटा उगला दिवस अरे मग खोटा म्हण


ती साध्या गोष्टींतून विणते अर्थ नवा

मी उगाच कोरत बसलेलो कण अन कण


-

अनंत ढवळे 


Thursday, September 26, 2024

गझल

तू हेही कर तू तेही कर 

करता करता एग्दिवशी मर



स्टेशन स्टेशन नुस्ता धुरळा

रस्ता रस्ता केवळ मत्सर


लागेना कोठेही गाणे 

बसलो ऐकत नुसती खरखर


माती बिलगेनाशी झाली

वाढत गेले इतके अंतर


माणूस तसाही सुंभउपट

बांधत बसतो नसलेले घर


.


अनंत ढवळे

Saturday, September 21, 2024

दोनोळ्या

मराठी कवींना शेर हे दोन ओळीचे साधन एव्हढे रुचावे आणि सशक्तपणाने लिहिता यावे याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मराठीला दोनोळ्या नव्या नाहीत. प्राचीन महाराष्ट्री प्राकृतात लहिलेल्या "गाथा" म्हणजे रचनेच्या दृष्टीने "दोनोळ्या" आहेत. दोन ओळींमध्ये मोठा आशय/ एखादी गोष्ट सांगून मोकळे होणे. गझल ही कवितेची विधा आपल्याकडे आधीपासूनच होती असा भाबडा दावा करणे हा इथे हेतू नाही. मी केवळ दोन ओळीमंध्ये विषय संहत रूपात मांडण्याची सवय आणि परंपरेचा उल्लेख करतो आहे.

गझल

आठवणींच्या जंगलातले मोर जसे  बोरबनातिल कच्चे-पक्के बोर जसे  ह्या झाडाच्या सावलीमधे ऊब अशी  माझ्यासोबत बसलेले की थोर जसे घट्टमिट्ट प्रेमाच्या...